छत्रपती शिवाजी महाराज आणि जातीयवाद

छत्रपती शिवाजी महाराज…उभ्या महाराष्ट्राचे सदैव पुज्यनीय असे दैवत.संपूर्ण महाराष्ट्रात महाराज म्हणजे असे व्यक्तिमत्त्व ज्याच्यासारखा मान आजवर कुणालाच प्राप्त झाला नाही.त्यामागे सुद्धा खूप मोठे कार्य आहे.महाराजांनी या भूमीत घडवून आणलेले बदल,इथल्या परिस्थितीचे केलेले आधुनिकीकरण आणि येथील विस्कटलेल्या जनतेला एकत्र आणून त्यांना परकीय शक्तीविरुद्ध लढण्याचे दिलेले सामर्थ्य याच गोष्टी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला एवढा आदर का आहे याचे अगदी स्पष्ट असे उत्तर म्हणावे लागेल.त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अथवा त्यांच्या काळातील इतिहासाचा अभ्यास करणारे अनेक अभ्यासक आज महाराष्ट्रातच काय तर संपूर्ण भारतात आपले कार्य अतिशय एकाग्रतेने करीत आहेत.मला त्यांचा विरोध कधीच नव्हता,न आहे आणि निश्तिच राहणार नाही.परंतु आजकाल एक नवीनच पिढी या संदर्भात निर्माण झालेली आहे.त्यांनी चालवलेले कार्य फक्त महाराजांचाच अपमान करीत नाही तर संपूर्ण शिवकाळाचाच ऱ्हास करीत आहे आणि मला याच लोकांविरुद्ध आज येथे थोडेसे सांगायचे आहे.

महाराजांच्या स्वराज्यनिर्मितिला त्या काळात सर्वांचाच हाथभार लागला होता.मावळातील १८ पगड जाती,९६ कुळी मराठे अगदी त्याचप्रमाणे कोकणस्थ तसेच देशस्थ ब्राह्मण तसेच मुसलमान आणि इतर धर्मीय या सर्वानीच महाराजांना त्यांच्या कार्यात मदत केली.अर्थात,ती सुद्धा महाराजांचीच किमया होती.परंतु सद्यपरिस्थिती पाहता असे दिसून येते कि काही लोक महाराजांचे अथांग असे चरित्र केवळ एका डबकापुरते ठेवत असून महाराजांना केवळ एका जातीत विभागतात आहेत.मला मान्य आहे की त्या काळात महाराजांच्या कार्याला काहींनी विरोध जरूर वर्तवला पण म्हणून ज्या लोकांनी त्यांना मदत केली त्यांचे चारित्र्य वाईट ठरूच शकत नाही.

या बाबतीत सर्वात पहिला मुद्दा येतो तो दादोजी कोंडदेवांचा.इतिहासात दादोजी महाराजांचे गुरु होते असा ठळक पुरावा नसला काय नि असला काय,त्याच्याशी माझे काहीही घेणे-देणे नाही.माझे म्हणणे इतकेच आहे की त्याद्वारे जो जातीयवाद काही लोकांनी सुरु केलेला आहे तो निंदनियच म्हणावा लागेल.कारण दादोजी गुरु नाहीत इथेच ते थांबले नाहीत तर त्यांचे चारित्र्य कसे वाईट होते,त्यांच्या कापलेल्या हाताची खरी गोष्ट कशी त्यांच्याच जातीतल्या इतिहासकारांनी समोर आणली नाही,असे निरनिराळे खोटे पुरावे दाखवून त्यांनी जातीयवादाला आधुनिक फोडणी दिल्याचेच दिसते.मला हे देखील मान्य आहे की इतिहास पूर्णपणे समोर यायलाच हवा,परंतु नवीन माहित होणारा इतिहास खरा असावा.असे खोटे पुरावे सिद्ध करून निव्वळ समाजात विषमता निर्माण करणारा निश्चितपणे नसावा.

दुसरा मुद्दा येतो तो सुद्धा जातीयवादाचेच उदाहरण निर्माण करतो.समर्थ रामदास स्वामी हे महाराजांचे आध्यात्मिक गुरु होते,असे इतिहासात बोलले जाते.येथे सुद्धा शिवाजी महाराज आणि समर्थांची भेट झालीच नव्हती असे खोटे आरोप करून यांनी जातीयवादाला पुन्हा चालना दिली.ते तर ठीक पण अजून पुढे जाउन समर्थांचे चरित्र कसे वाईट होते,त्यांच्या बळ नव्हते म्हणून ते बोहोल्यावरून ऐन लग्नाच्या दिवशी पळून गेले आणि सर्वात तुच्छ म्हणजे ते आधी आदिलशहा तसेच नंतर औरंगजेबासाठी काम करीत व महाराजांच्या प्रदेशातील माहिती त्याना पोहोचवत,असे खोटे आरोप देखील यांनी त्यांच्यावर केले.बरं,आरोप केले तेही बरोबर नाहित.कुणी म्हणतो औरंजेबाचे तर कुणी म्हणतो आदिलशहाचे दूत होते.आता,याला काय म्हणावे?

या सर्व गोष्टी सांगून ही लोक महाराजांचेच अवगुण लोकांसमोर आणत नाहीत का? बघा ना,जर का समर्थ शत्रूचे दूत असते तर महाराज त्यांना ओळखू शकले नसते का? महाराज नेहमीच सावध असत,असे सुद्धा ही लोक म्हणतात. मग जर सावध होते तर त्यांनी वर उल्लेख केलेल्या दोन्ही व्यक्तींवर विश्वास का ठेवला? मित्रांनो इतिहासाचे संशोधन नेहमीच तटस्थ वृत्तीने व्हायला हवे.परंतु ही माणसं तर हेही बोलायला कमी नाहीत की,महाराज असते तर त्यांनी संपूर्ण ब्राह्मण जातीला नष्ट करून एक वेगळे जग निर्माण केले असते.स्वतःला मराठे म्हणवून ही माणसं आपण हिंदू धर्मात मोडतच नाही असे सांगतात.वैदिक,अवैदिकाचा वाद मांडतात.जो माणूस आपल्या आयुष्यात केवळ हिंदू धर्म पप्रस्थापित करण्याकरीता लढला त्याच माणसाची लेकरे आज आपण त्या धर्माचे नाही,असे सांगून त्या समुद्राएव्हड्या व्यक्तिमत्त्वाचा अपमान करीत नाही का?

मित्रांनो वेळ आली आहे सर्व धर्मानी,जातींनी एक होऊन या समाजविघातकांविरुद्ध लढण्याची,कारण यांचा कुठलाच धर्म नाही कि जात नाही याना फक्त आपला फायदाच ठावूक आहे.नाहीतर समाजात अशांतता निर्माण करण्याचा एक महारोग यांना जडला आहे,दुसरे काहीही नाही.बघा,पटलं तर करा विचार.

Popular posts from this blog

संवाद….माणसाला मिळालेली एक उपयुक्त देणगी

मराठी भाषा- एक संस्कृती

मराठी इतिहास आणि छत्रपती संभाजी महाराज भाग १