मराठी इतिहास आणि छत्रपती संभाजी महाराज भाग २

 मागच्या भागात आपण संभाजीराजांच्या चरित्राबद्दल असलेल्या अनेक भ्रमांबद्दल चर्चा केली.तिलाच आज आपण समोर नेणार आहोत.संभाजी राजांसारख्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आज इतकी सांशकता का? हा प्रश्न खरंतर खूप वर्षांपासून विचारला जातोय.प्रत्येकानी आपापल्या परीने या चरित्राबद्दल अभ्यास करताना इतिहास पडताळून पाहिला,परंतु अजूनही एक खंबीर मत कुणासही द्यायला जमले नाही.आपल्या सर्वांनाच माहित आहे की,या वादाची सर्वात पहिली ठिणगी पडली ती मल्हार रामराव चिटणीस यांच्या बखरीमुळे.समोर जाउन राम गणेश गडकरी यांच्या राजसंन्यास या अपुऱ्या राहिलेल्या नाटकात सुद्धा संभाजी राजांच्या चारित्र्यावर शंका वयात केली गेली.ती कितपत खरी आहे,किंवा कितपत खोटी हे पुराव्यानिशी सांगता येत नसले तरीसुद्धा काही गोष्टी खरच पटत नाही.मल्हार रामरावांच्याबाबत एक मोठा इतिहास आहे.मल्हार रामराव हे बाळाजी चिटणीसांचे वंशज,अगदी जवळचे.आता बाळाजी चिटणीसांना संभाजी राजांनी हत्तीच्या पायी दिले,त्यामुळे निश्चितच त्यांचे वंशज राजांचा तिरस्कार करणार,असे बोलले जाते.मल्हार रामरावांनी संभाजी राजांबद्दल जे काही लिखाण केलेले आहे ते सर्व द्वेषबुद्धीने,असेच सर्वांचे मत आहे.परंतु जर असे पाहिले,तर ही बखर अस्सल ऐतिहासिक पुरावा म्हणून गणल्या जाते.आता जर का अस्सल पुरावेच असे आहेत,तर मग इतिहास शोधायचा कुठे? मल्हार रामरावांनी जर का ती बखर सुडाच्या भावनेने रचून लिहिली असेल तर,त्यात प्रत्येक गोष्ट त्याच दृष्टीने असायला हवी होती,परंतु त्याच बखरीत काही तत्कालातील सत्य देखील सांगितलेले आहे,जे पुराव्यानिशी आणि सर्वानुमते सिद्ध देखील केले जाते.

संभाजी राजे स्त्रीलंपट होते कि नव्हते? ते अघोरी विद्येच्या अधीन होते  का? त्यांचा मित्रसमुह त्यात सामील होता का? ते मद्यप्राशन करीत होते का? ते दिलेरखानाला म्हणजेच मुघलांना नेमके कोणत्या हेतूने मिळाले होते? जर का चांगल्या हेतूने,मग थोरले महाराज त्यात सामील होते का? अशा अनेक प्रश्नांची अचूक आणि विश्वासक उत्तरे अजून मिळालेली नाहीत.त्यामागे कारण कुठले हे देखील पूर्णपणे समोर आलेले नाही.जर का समीक्षण करायचेच म्हटले तर त्याकाळातील समाज,रूढी,परंपरा,जीवन पद्धती,तत्कालीन समज अशा सर्व गोष्टींचा अभ्यास करावा लागतो.यावर माझ्या वाचण्यात आलेला सर्वात चांगला लेख म्हणजे नरहर कुरुंदकरांची "श्रीमान योगी"तील प्रस्तावना.त्यांनी केवळ शिवरायांचेच चरित्र त्यात स्पष्ट केले नाही तर,त्यांच्या जवळच्या व्यक्तींवर देखील प्रकाश टाकलेला आहे.ते म्हणतात की,शिवाजीच्या कार्याची तीन भागात पडताळणी होते.एक शहाजी राजांसोबत,दुसरी त्यांची स्वतःची आणि तिसरी संभाजी राजांसोबत.याच चर्चेला पुढे नेताना ते म्हणतात की,संभाजीचे तरुणपणातील व्यक्तिमत्त्व शिवकालापर्यंत मोडले जाते.तेव्हा संभाजी तरुणवया पर्यंत कसा होता हे रेखाटणे,हे खूप कठीण काम होय.त्याकाळ राजाला नाटकशाळा असणे हे गैर मानल्या जात नसे.स्वतः शहाजी राजांना त्यांच्या स्वतःच्या दोन नाटकशाळा होत्या.राजाने मद्यप्राशन करणे देखील त्या काळी गुन्हा नव्हता.

संभाजी तरुण वयात शाक्तपंथीयांच्या आहारी गेला होता काय याचे उत्तर आपल्याला जास्त ठिकाणी "हो" असेच मिळते.परंतु हे केवळ तरुण वयापर्यंत.त्या मागची पार्श्वभूमीदेखील जाणून घेण्यासारखी आहे.जीजामातेचे देहावसान झाल्यावर थोरल्या महाराजांनी संभाजी राजांकडे फार कमी लक्ष दिले,असे इतिहासात बोलले जाते,आणि नेमकी हेच काही समाजकंटकांना पथ्याशी पडले.त्यांनी संभाजी राजांच्या विरोधात कामे सुरु केली.संभाजी राजांचा रोख-ठोक स्वभाव त्यांना नडला.प्रत्येक राजाने अथवा भावी राज्यकर्त्याने बोलण्यात अतिशय रोख-ठोक असू नये,असेच इतिहास सांगतो.परंतु संभाजी राजांचा स्वभाव या उलट होता.चुकीची कामे त्यांना कधीच पटत नसत आणि थोरले महाराज माहित असूनसुद्धा अशांकडे दुर्लक्ष करतात हे त्यांना पटत नसे.ना.स. इनामदार "राजेश्री"त म्हणतात की,शिवाजी राजांना आपल्या राज्यात काय चालले आहे याची बित्तंबातमी हेरांकडून कळत असे.अष्टप्रधानांच्या काळ्या कामाचे अनेक पुरावे त्यांनी पेटीबंद करून ठेवले होते आणि याची उघडणी त्यांनी संभाजी राजांशी एकांतात केली देखील होती. निव्वळ त्या व्यक्तींचा अपमान नको व स्वराज्य टिकायला हवे,अशी त्यांची इच्छा होती,कारण स्वराज्याला अगदी थोड्या काळात मुघलांच्या अफाट सैन्याला उत्तर द्यायचे होते.त्याकरिता घरातील हेवे-दावे नष्ट करून ही सगळी ताकद त्यांना त्या कामात उपयोगात आणायची होती.हे नियतीला मान्य नव्हते,हा पूर्णपणे वेगळा भाग आहे.

या दोघाही बाप-लेकात अनेक संभाषणे एकांतात होत,असे देखील म्हटले जाते.त्यातूनच मग दिलेरखानाला सामील होण्याची कथा रंगविली जाते.परंतु तिचे अस्तित्वच खोट्यावर बांधले असल्याने ती पटत नाही.संभाजी राजे मुघलांना का सामील झाले,हे आजवर पूर्णपणे समोर आलेले नाही.परंतु आपल्या बापाबद्दल असलेला अविश्वास आणि स्वतः विरुद्ध घडणाऱ्या घटना यांना कंटाळून राजांनी हे अतिशय धाडसी पाउल उचले असावे,असे सर्वानुमते मान्य करण्यात आलेले आहे.तरीसुद्धा अनेक इतिहासकार सत्य शोधण्याचा कौतुकास्पद प्रयत्न अजूनही करत आहेत.संभाजी राजांच्या बद्दल अजून एक शंका आहे ती त्यांच्या मित्रसमूहाची आणि त्यांच्या आणि राजांच्या असलेल्या संबंधांची.त्यातूनच मग एक वेगळीच गोष्ट लोकांच्या मनावर बिंबवण्याची जी आज-काल एक नाविक खेळी सुरु झालेली आहे,ती एक वेगळीच कथा.या सर्वांवर नक्किच प्रकाश टाकू परंतु पुढच्या भागात.तोपर्यंत संभाजी राजांना आठवून,त्यांचे गुण आत्मसात करून आपले चरित्र समृद्ध बनवण्याचा प्रयत्न करा.

Popular posts from this blog

संवाद….माणसाला मिळालेली एक उपयुक्त देणगी

मराठी भाषा- एक संस्कृती

मराठी इतिहास आणि छत्रपती संभाजी महाराज भाग १