मराठी इतिहास आणि छत्रपती संभाजी महाराज भाग ३

मागच्या पहिल्यादुसऱ्या भागात संभाजी महाराज, त्यांचा इतिहास तसेच त्यांच्यावरील आरोप आपण पाहिले. त्या आरोपांवरून शेवटी हेच म्हणावे लागेल की, संभाजी राजे कसेही असले तरीसुद्धा त्यांच्या ठिकाणी स्वराज्याबद्दल, शिवरायांबद्दल प्रेम हे होतेच आणि काही लोकांच्या फुकाच्या आरोपांमुळे त्यांचे चारित्र्यहनन केले गेलेले आहे. प्रत्येक राजा हा थोडाफार का होईना वाईट सवयींचा असतोच, शिवराय या सगळ्यांपेक्षा फार फार वेगळे होते म्हणूनच आज आपण त्यांची पूजा करतो. त्यांचा जन्मच मुळी स्वराज्य घडविण्याखातर झालेला होता. परंतु जो राजा मिळालेल्या काळात आपल्या राज्याचा भंग होऊ न देता उलट त्याची भरभराट करतो, तोच खरा प्रजाहीतदक्ष म्हणून नावारूपास येतो. शिवरायांनी देखील याचाच अवलंब केल्याचे दिसून येते. पुरंदरचा तह आणि शहाजी राजांकारीता केलेला करार वगळता फार कमी वेळेस श्रेष्ठींनी आपल्या राज्याचा भंग केला अथवा त्यांना करावा लागला. परंतु ते नेहमीच जिंकलेला प्रदेश वाचविण्याकरिता दक्ष असत. समर्थांनी संभाजी राजांना पाठविलेल्या पत्रात याची एक झलक पाहण्यास मिळते. हेच संभाजी राजांनी सुद्धा केले आणि मिळालेल्या नऊ वर्षांच्या कारकीर्दीत स्वराज्याचा कुठलाच भाग कोणत्याच शत्रूला मिळू दिला नाही उलट नवीन भाग जिंकून तो स्वराज्याला जोडला.

शिवाजीराजे समाधिस्त झाल्यानंतर आणि होण्याआधी ज्या काही घटना घडल्या त्या सर्वांची रीतसर मांडणी केल्यानंत मला तरी असेच दिसले की, शिवरायांचे मत संभाजी राजांविषयी फार नाही तरी थोडे का होईना वाईट झालेच होते. त्यामागे बाहेरून येणाऱ्या बातम्या कारणीभूत होत्या, असे मला वाटत नाही कारण शिवराय हलक्या कानाचे तर मुळीच नव्हते आणि संभाजी राजांना सुद्धा आपल्या पित्याबद्दल आदर हा होताच, असेच पुराव्यांवरून स्पष्ट होते. माझ्या मते यामागे कदाचित शिवरायांचे हेर खाते असावे कारण शिवरायांनी संभाजी राजांवर लक्ष ठेवण्याचे काम काही निवडक विश्वासू सरदारांना दिलेले होते, असा उल्लेख ना. स. इनामदारांच्या "राजेश्री"त आहे. परंतु याचा अर्थ, शिवाजी राजांनी संभाजी राजांवर हेर नेमून त्यांच्यावर पाळत ठेवली होती असा न घेता केवळ काळजीपोटी महाराजांनी ही युक्ती केलेली असावी. संभाजी राजांविरुद्ध रचले जात असलेली रोजची कट-कारस्थाने थोरल्या महाराजांच्या कानांवर पडत होती. त्यातून त्यांचा आणि संभाजी राजांचा स्पष्ट संवाद यावर होत नव्हता, मुघली फौजांच्या रोजच्या हालचाली समजून घेण्यात महाराज गुंग असल्याने या बाबतीत त्यांचे नाईलाजाने का होईना दुर्लक्ष झालेच.

शिवरायांचे महानिर्वाण घडल्यानंतर, संभाजी राजांना त्यांच्या पित्याच्या अंत्यदर्शनापासून दूर ठेवणे, धाकटे असून देखील सर्व विधी राजाराम महाराजांकडून करवून घेणे, या मागे निव्वळ गुप्तता ठेवणे हा हेतू निश्चितच नव्हता, तर या मागे खूप मोठे राजकारण खेळले जात होते यात तिळमात्रही शंका नाही. जर का हंबीरराव मोहित्यांनी मोक्याच्या क्षणी संभाजी राजांची साथ न देता आपल्या सख्ख्या भाच्याला जवळ केले असते तर कदाचित मी येथे वेगळाच लेख लिहित असतो. परंतु नियतीला हे मान्य नव्हते आणि सत्याचा अखेरीस विजय होतो हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. राज्याभिषेक केल्यानंतर संभाजी राजांनी शिवारायांच्या चालू ठेवलेल्या परंपरा त्यांच्या वैरी ठरल्या असेच कदाचित म्हणावे लागेल. वतने न देण्याची शिवाजी राजांची रीत संभाजी राजांनी सुद्धा चालू ठेवली आणि या मुळेच इतर वतनदार मराठे त्यांचे शत्रू बनले. या उलट राजाराम महाराजांनी वतने वाटण्याची परंपरा पुन्हा सुरु केली, त्यामुळेच कदाचित इतर वतनदारांचा समुह संभाजी राजांच्या शेवटच्या काळात राजाराम महाराज तसेच औरंजेबाकडे आकर्षिल्या गेला आणि मराठी मातीत ठासून भरलेली बेईमानी मराठी राज्याचीच नाशक बनली. दुसरीकडे, अष्टप्रधानांना शिक्षा केल्याने त्यांचे वंशज तसेच सहकारी निश्चितच संभाजी राजांच्या विरोधात गेले.

अकबराला हाताशी धरून संभाजी राजांनी जी खेळी करायची ठरवली होती, ती जर का सत्यात उतरली असती तर मग कदाचित त्यांचे चरित्र अगदी या उलटेच लिहिले गेले असते. मुघली सांबर आपसूकच वाट चुकून मराठी जंगलात शिरलं होतं. त्याबदल्यात खूप काही गोष्टींचा फायदा मराठी सत्तेला होणार होता आणि हेच नेमके दिल्लीत बसलेल्या त्या निष्णात राजकारणपटुने ओळखले होते कदाचित. त्यामुळेच त्याने अकबराला जेथे दिसेल तेथे कत्तल करण्याच्या आज्ञा आपल्या सरदारांना दिलेल्या होत्या. पुढे अकबराचे बोट धरण्यात अर्थ नाही हे संभाजी राजांच्या सुद्धा लक्षात आलेलेच होते, असे मला वाटते म्हणूनच दुर्गादास राठोड यांच्यामार्फत अकबराकडून पुढील काळात संरक्षण देण्याच्या अटीवर त्यांनी अकबराला सुरक्षित ठिकाणी पोहोचते केले.

गणोजी शिर्क्यांची पार्श्वभूमी शिवकालापासून पहावी लागते. शिर्के कुटुंबियाची वतनासाठी असणारी हाव शिवाजी राजांनी अतिशय मोठा राजकारणी डाव खेळून तात्पुरती हाणून पाडली होती. परंतु संभाजी राजांनी राज्याभिषेक केल्यानंतर पुन्हा एकदा ही माणसं वतनासाठी आग्रह धरू लागली जी संभाजी राजांनी पूर्णपणे फेटाळून लावून त्याचा एकदाचा निर्णय लावला. याच कारणामुळे दु:खी होऊन त्यांचा बदला घेण्याची चाल गाणोजींनी खेळली ज्यात मराठ्यांच्या छात्रपतीचा बळी गेला. पुढे तो "मृत्युंजयी" ठरला तो केवळ त्याने दाखवलेल्या असमान शौर्याने आणि त्याच्या अंगी असलेल्या अथांग अशा देशप्रेमामुळे

याच विषयावर जसजसे आपण समोर चालत जातो, तेव्हा आपल्याला नवीन काही गोष्टींची माहिती होते. त्यात काही फायद्याच्या तरीही, काही पूर्णपणे समाजविघातक असून खोटा इतिहास लोकांच्या माथी फ़ेकतात. सध्या असे काम फार जोरात सुरु आहे. संभाजी राजांचे चारित्र्य लिहीताना ज्या चुका काहींनी केल्या त्यातील  बहुतांश व्यक्ती या ब्राह्मण समाजात मोडतात. स्वतः मल्हार रामराव ब्राह्मण होते. याच एका गोष्टीचा फायदा घेऊन काही समाजविघातक संभाजी राजांच्या बदनामीचे संपूर्ण श्रेय या समाजावर लादून मोकळे होतात. मग त्यांचे झाले की, संपूर्ण शिवेतीहासातील ब्राह्मण वर्ग कसा कपटी होता अशा प्रकारच्या खोट्या गोष्टी सांगून, खोटा इतिहास घडवून काही-बाही हे लोक बोलत बसतात आणि विनाकारण समाजाला एका वेगळ्याच संकटाला सामोरे जावे लागते. याबद्दल पुढच्या लेखात पाहूच. तोवर…
                                   
                                      ।। जय भवानी । जय शिवाजी । जय संभाजी । जय महाराष्ट्र ।।

             

Popular posts from this blog

संवाद….माणसाला मिळालेली एक उपयुक्त देणगी

मराठी भाषा- एक संस्कृती

मराठी इतिहास आणि छत्रपती संभाजी महाराज भाग १