मराठी भाषा- एक संस्कृती

२७ फेब्रुवारी ला मराठी भाषा दिवस साजरा झाला. खरंतर त्या दिवशीच हा लेख ब्लॉगवर टाकायची इच्छा होती, परंतु काही कारणास्तव जमले नाही. तरीसुद्धा या विषयावर लिखाण करण्याची इच्छा काही स्वस्थ बसू देईना. तेव्हा म्हटलं आता हे करावाच लागणार, नाहीतर रात्रीची झोप आणि दिवसाची भूक कुठे आणि कशी हरवून बसील, ते मलाही कळणार नाही. त्यामुळेच आज हा लेख लिहत आहे. सर्वप्रथम या ब्लॉगवरील सर्व वाचकांना जागतिक मराठी भाषा दिनाच्या अगदी मनापासून शुभेच्छा देतो आणि नंतरच मूळ लेखाला हाथ घालतो.

मित्रांनो, मराठी ही निव्वळ भाषाच नाही तर एक संस्कृती. मराठी भाषेचा इतिहास खूप आधीपासून म्हणजेच अगदी राष्ट्रकुट राजांपासून अस्तित्वात आहे. सातवाहनांनीच खरंतर मराठी भाषेला प्रमुख भाषेचा दर्जा देऊन आपल्या राज्यात मराठी अनिवार्य केली. परंतु त्यानंतर मराठी भाषेला कुणी वाली मिळाला नाही. त्यानंतर मराठी साठी सर्वात मोठे कार्य कुणी केले असेल तर संत ज्ञानेश्वरांनी. भगवद्गीतेचा अन्वयार्थ मराठीत लिहून सर्वसामान्यांना "ज्ञानेश्वरी"तून भक्तीची कवाडं खुली करून देऊन मराठी चळवळीचीच जणू स्थापना केली. संस्कृत भाषेचे गूढ अर्थ अगदी सोपे करून त्यांनी ज्ञानेश्वरीत ते मांडले आणि भगवद्गीतेपासून दूर गेलेल्या समाजाला जवळ आणून त्यांना भक्तीशी आणि परिणामी ईश्वराशी जोडण्याचे काम संत ज्ञानेश्वरांनी मराठीतूनच केले. संत ज्ञानेश्वरांप्रमाणे इतर संतांनी देखील मराठीचाच उपयोग करून मराठी भाषेला पावन केले. परंतु तरीसुद्धा एका मोठ्या क्षेत्रात या भाषेचा उगम अजून व्हायचा होता आणि त्यामुळेच मराठीला लोकमान्य भाषेचा दर्जा मिळालेला नव्हता.

संतांनी मराठी भाषेचा उपयोग वाढवून मराठी साहित्य रचले खरे परंतु ते केवळ सामान्य लोकांना समजावे याकरीता. समाजव्यवस्थेतून पुढे जाउन राजकीय क्षेत्रात या भाषेचा अंतर्भाव झाला तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात. महाराजांनी पंडित रघुनाथपंतांना सांगून "राज्यव्यवहार कोश" बनवून घेतला. त्या काळात राजकीय क्षेत्रात फारसी, उर्दू या परकीय भाषांचा मोठ्या प्रमाणावर पगडा होता. स्वराज्य संपूर्णरीत्या स्वीकारायचे असल्यास राज्यातील प्रजेला ते अगोदर समजायला हवे, त्याकरिता मग प्रजेला समजेल अशा भाषेतूनच त्याचे विवरण हवे, हे छत्रपतींनी ओळखले होते. त्यामुळेच पूर्ण स्वराज्याच्या मजबूतीसाठी महाराजांनी मराठी भाषेला प्राधान्य देऊन राज्यव्यवहार कोशाची रचना करून मराठी भाषेला मोठेच महत्त्व प्राप्त करून दिले. शिवाजी महाराजांनंतर संभाजी महाराजांनी देखील याचे महत्त्व जाणून मराठी भाषेलाच राजकीय भाषेचा दर्जा दिला. अगदी याच काळापासून मराठी भाषा जागातील इतर लोकांना देखील समजली आणि मराठी संस्कृतीचा खऱ्या अर्थाने उदय झाला, असे म्हटल्यास कमीपणाचे ठरणार नाही.

ज्याप्रमाणे प्रत्येक राज्याची श्रीमंती त्या राज्याचा अर्थव्यवस्थेवरून केली जाते, अगदी त्याचप्रमाणे प्रत्येक भाषेची श्रीमंती ही त्या भाषेतील साहित्याच्या श्रीमंतीवरून करण्यात येते. सुदैवाने आजपर्यंत मराठी भाषेला लेखकांची, कवींची उणीव कधीच भासली नाही. अगदी संत वाङ्मायापासून ते आजच्या कथा, पटकथांपर्यंत अनेक साहित्य रचना या भाषेत झालेल्या आहेत. गद्य, पद्य, नाटक अशा तिनही क्षेत्रात मराठी भाषेतील साहित्य रचना उत्कृष्ट दर्जाची असून आजही ती लोकांना अगदी प्रसन्न अशीच भासते. मराठी चित्रपटांनी सुद्धा यात भरच घातली आहे. अनेक उत्कृष्ट दर्जाचे चित्रपट मराठी भाषेत प्रदर्शित झालेले आहेत, होतातही आहेत. या चित्रपटांमुळेच आज मराठी भाषेचा झेंडा सातासमुद्रापार जाउन तिचे महत्त्व दशपटीने वाढलेले आहे. मधल्या काळात मराठी भाषेचा दर्जा खालावल्या गेला होता खरा, परंतु त्या नंतरच्या काळात याच मराठी भाषेने मुसंडी मारून स्वतःचे महत्त्व कमी होऊ न देता वाढवलेलेच आहे आणि याचे बहुतांशी श्रेय या मराठी चित्रपट सृष्टीलाच जाते. मराठी साहित्य यात क्रमांकाने दुसरे. मराठी तरुणाई तसेच देशातील इतर तरुणांना मराठी भाषेशी जोडण्याचे काम मराठी चित्रपटांनी, त्यांच्याशी समरस असल्याने फार मोठ्या प्रमाणात व प्रचंड उत्साहाने तसेच शिस्तीने केल्याचे दिसते. या सर्वात मराठी नाटक थोडे मागे पडले खरे, परंतु तरीसुद्धा या नाटकांना देखील आता नवा साज चढवण्याचे कार्य काही मराठी बहाद्दरांनी हाती घेतलेले आहे. ती लोक त्यात सफल होवोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

मराठी भाषेला अजून मोठ्या प्रमाणात महात्तता प्राप्त झाली ती परदेशात  तिकडेच स्थायिक झालेल्या लोकांच्या कौतुकास्पद प्रयत्नांमुळे. महाराष्ट्रातून अनेक युवक निरनिराळ्या कारणासाठी परदेशात जातात काही तेथेच स्थायिक देखील होतात परंतु आपल्या मायबोलीची आठवण त्यांना सोडत नाही. आपल्या मराठीचीच ती जादू आहे. यावर उपाय म्हणून यात काहींनी अतिशय प्रयत्न करून अनेक मराठी संस्थांची परदेशात सुद्धा स्थापना केलेली आहे. या संस्थेद्वारे मराठी भाषेचे महत्त्व ही लोक परदेशातील मुलांना तसेच वायस्कांना सुद्धा समजावून देतात. या संस्थांद्वारे आता मराठी शाळांची सुद्धा निर्मिती झालेली आहे. या शाळांमुळे परदेशात सुद्धा मराठी भाषा लोकप्रिय होऊन तिकडील अनेक तरुण-तरुणी महारष्ट्रात येउन यावर संशोधन करण्यास सुद्धा येतात. या संस्थांद्वारे परदेशात मराठी भाषिक संमेलन सुद्धा भरवण्यात येते त्याद्वारे मराठी साहित्याची गोडी परदेशातील लोकांना सुद्धा लागते आणि परिणामी मराठी भाषेची जडण-घडणच होते.

तर अशा या मराठी भाषेचा इतिहास अतिशय आव्हानात्मक असा असला तरीसुद्धा काही लोकांच्या अनन्यसाधारण कार्यामुळे आज मराठी भाषेचा वर्तमान अतिशय सुंदर असल्याचेच दिसते आणि यावरूनच तसेच वर्तमान पिढीचे कार्य, विचारसरणी बघता मराठी भाषेचे भविष्य यापेक्षाही उत्कृष्ट दर्जाचे असल्यास आश्चर्य करण्याचे काहीच कारण नाही. तेव्हा मित्रांनो, या भाषेचा उद्धार करण्याचे काम आपल्या सर्वांनाच एकत्र येउन करावे लागणार आहे, ते करताना या भाषेचा उपयो जास्तीत जास्त करणे आवश्यक आहेच परंतु याहीपेक्षा महत्त्वाचे आहे मराठी भाषेसाठी असणारा आदर, प्रेम तसेच तिची समृद्धी वाढविण्याची प्रामाणिक इच्छा.

शेवटी, पुन्हा एकदा मराठी भाषा दिनाच्या उशिरा का होईना मापासून शुभेच्छा…

Popular posts from this blog

संवाद….माणसाला मिळालेली एक उपयुक्त देणगी

मराठी इतिहास आणि छत्रपती संभाजी महाराज भाग १