टिळक-गांधी संबंध


आत्ता कालच लोकमान्य- एक युगपुरुष बघून आलो. एक चित्रपट म्हणून तो सुरेख आहे. खरंतर इतिहासातील पात्रांवर चित्रपट चालणे, हे आपल्या देशात जरा कठीणच काम आहे. परंतु सध्याचे वातावरण पाहता  टिळकांसारख्या जहाल विचारांच्या महापुरुषावर चित्रपट असल्यामुळे तो चालण्याची शक्यता जरा जास्तच आहे. अर्थात, त्या चित्रपटासाठी केलेली मेहनत जरूर तो बघताना लक्षात येते. त्यातील कलाकार, तसेच दिग्दर्शक, लेखक अशा संपूर्ण चमूचेच चित्रपट बघताना जरूर कौतुक करावेसे वाटते. परंतु, चित्रपट बनवताना, त्यातील पात्र निवडताना आणि त्या पात्रासाठी योग्य तो कलाकार निवडताना काही त्रुटी जरूर राहिल्या आहेत. टिळक आणि गांधी तशा अतिशय विरुद्ध व्यक्तिरेखा. एक "लोकमान्य" तर दुसरा "महात्मा". तरीसुद्धा काही गोष्टी नाइलाजास्तव चित्रपटात मांडलेल्या नाहीत.

तर चित्रपटाद्वारे एक चुकीचा संदेश लोकांपर्यंत गेलेला आहे, असे मला वाटते. टिळकांचा कणखरपणा, त्यांचे जहाल विचार तसेच एकंदर आक्रमक स्वभाव दाखवताना, बाकी महापुरुषांच्याकडे तेव्हढे लक्ष दिलेले मला आढळले नाही. प्रामुख्याने त्यांच्या विरुद्ध दिशेला असलेल्या भूमिकांमध्ये ते स्पष्टपणे जाणवते. ती आगरकरांची भूमिका असो, रानडेंची असो किंवा महात्मा गांधीची असो. त्यात दिग्दर्शकाची चूक आहे, असे नाही. बऱ्याच अंशी ते ती भूमिका निभावणाऱ्या कालाकालावर देखील अवलंबून असेल परंतु एक चुकीचा संदेश चित्रपटामार्फत जनतेपर्यंत जरूर गेलेला आहे.

गांधीं-टिळक भेटीचे दृश्य दाखवताना चित्रपटात काही आक्षेपार्ह म्हणावे असे संवाद जरूर आहेत. गांधींच्या आपण अहिंसक मार्गाने स्वातंत्र्य मिळवू शकतो या मतावर चित्रपटातील टिळक उत्तर देतात ते काही अशा प्रकारे आहे, "मी मागल्या  २५ वर्षांपासून ब्रिटीशांशी स्वातंत्र्यासाठी लढतो आहे. स्वराज्यासाठी आपल्याला रक्त सांडावे लागेलच, त्याशिवाय मिळालेल्या त्या स्वराज्याला किंमत उरणार नाही." हे वाक्य ऐकल्यावर खरंतर टिळकांविषयी आदर वाटायला लागला पण क्षणभरच. आता आपले रक्त सांडण्याचे महत्त्व गांधींपेक्षा चांगलं सांगणारा दुसरा क्वचितच मिळेल. १९४८ साली सनातन्यांनी गांधींचा अंत घडवून  आणला. त्याआधी कुणी देशवासी देशाच्या कल्याणासाठी माझे प्राण घेण्यास जरी आला तरी मी ते त्याला देईन, असे उद्गार पोलिसांजवळ काढून जीव जाण्याचा संशय असताना सुद्धा, प्रार्थनेला जाताना सुरक्षा नाकारणाऱ्या गांधींना देशासाठी बलिदान करण्याचे महत्त्व माहित नव्हते का? असा सवाल माझ्यासमोर उभा झाला.

टिळक आणि गांधी यांचे संबंध चित्रपटात फारशे चांगले दाखवले गेलेले नाहीत. परंतु स्वतः गांधीजीच आपल्या आत्मचरित्रात आपले आणि टिळकांचे मत भिन्न असले तरीसुद्धा दोघेही एकमेकांचा तेव्हढाच आदर करत असे लिहतात. गांधींना गोखल्यांना भेटण्याचा सल्ला देणारेही टिळकच. गांधींच्या असहकार आंदोलनाला टिळकांनी सुद्धा समर्थन दिले असते, असे इतिहासाचार्य राजवाडे सांगतात. तेव्हा टिळक आणि गांधी यांत मतांतर असले तरीसुद्धा द्वेषाला तेथे जागा नव्हतीच.

दोघांनाही स्वतंत्र अशी स्वतःची मतं होती. दोघेही आपापल्या त्या मतांवर ठाम असत. त्यामुळेच दोघांच्याही जीवनाला तेव्हढेच महत्त्व प्राप्त होते. गांधींचा अहिंसावाद राजकारणात त्याकाळात नवा असला तरीसुद्धा आफ्रिकेत त्यांनी त्याची ताकद आजमावली होती. त्यामुळेच पुढे भारतात देखील त्यांनी तो स्वीकारला आणि त्यात सफल झाले. पुढे त्या अहिंसेने आंतरराष्ट्रीय कीर्ती प्राप्त केली. टिळक मुळातच कणखर. गांधींच्या शब्दांतच सांगायचं तर ते हिमालयच. जहाल मतवादी. जशास तसे वागून समोरच्याला त्याने केलेल्या अन्यायाची जाणीव करून देणे, ही विचारसरणी. चुका दोघांकडूनही झाल्या असतील परंतु त्यामुळे त्यांनी स्वतः च्या विचारांना आणि देशप्रेमाला सोडलं नाही, ही बाब दोघांकडूनही शिकण्यासारखी आहे.

वेळेच्या कारणास्तव चित्रपटात सर्व गोष्टी येऊ शकत नाही, हे वास्तव मला देखील कळते. परंतु, ऐतिहासिक कलाकृतीत,मग ती कोणत्याही स्वरूपात असो, वास्तवही तेव्हढेच मांडायला हवे, असे मला वाटते. खरंतर टिळक आणि गांधी या दोन्ही विचारातून एक संपूर्ण नवीन विचारशैली घडवून त्याचा देशहितासाठी फायदा करून घेण्यातच आपण सर्वांचे हीत सामावलेले आहे.    

Popular posts from this blog

संवाद….माणसाला मिळालेली एक उपयुक्त देणगी

मराठी भाषा- एक संस्कृती

मराठी इतिहास आणि छत्रपती संभाजी महाराज भाग १