एक खुलासा

(सूचना: हा एखादा नवीन लेख नाही. यातू ही भयकथा यापुढे येथे प्रसिद्ध होणार नसल्यामुळे त्याबाबतची माहिती वाचकांना देणे मला महत्त्वाचे वाटल्याने हे निवेदन पप्रसिद्ध केलेले आहे.)

नमस्कार…

आपण "यातू" ही भयकथा येथे वाचायला आलात याबाबत आपले अगदी मन:पूर्वक आभार. पण माफ करा, यातू या भयकथेचे पुढील भाग मी या ठिकाणी यापुढे उपलब्ध करून देऊ शकणार नाही. त्याचं कारण सांगण्याकरिताच हा लेखनप्रपंच…

माणसाच्या जीवनात, त्याच्या विचारात नेहमी काही गोष्टींचा प्रभाव असतो. त्या विचारांनुसारच प्रत्येक गोष्टीचे तो आकलन करत असतो. हा विचारांचा प्रभाव उत्तरोत्तर वाढत जाणे ही कौतुकास्पद बाब असेलही कादाचित पण त्या विचारांना जर का एखाद्या प्रतीविचाराने तडा जात असेल आणि त्या प्रतीविचाराची विशुद्ध चिकित्सा करून जर तो प्रतीविचार आपल्या सद्सद्विवेक बुद्धीला पटत असेल तर आधीच्या विचारांचा त्याग करून नवीन विचार आत्मसात करणे मला जास्त महत्वाचे आणि कालानुरूप सुसंगत वाटते. आणि हाच विचार आपल्या अनेक थोर पुरुषांनीही मान्य केलेला आहे. तुमचे विचार कालानुरूप बदलत गेले पाहिजेत, ते एकाच स्वरूपाचे न राहता ते वेळोवेळी उत्क्रांत होत जावे हे अनेकांनी मान्य केलेले आहे.

माझा सुद्धा आधी भूत-प्रेत अप्राकृतिक घटना यावर विश्वास होता. व्यक्तिश: माझ्यासोबत अशा घटना आजवर घडल्या नसल्या तरीसुद्धा माझ्या नातेवाईकांच्या तसेच इतरही काही लोकांच्या सांगण्यावरून आणि त्यांनतर या बाबतीत मी वाचलेली काही पुस्तके व त्यातील लेखकांच्या वक्तव्यांवरून माझा अशा गोष्टींवर विश्वास दृढ झालेला होता. परंतु मागील काही काळापासून अंधश्रद्धा निर्मुलन समिती, तसेच काही विज्ञानवादी लेखकांची मते वाचण्यात आली. तसेच या विषयावर अनेक लोकांना प्रश्न विचारून झाले एव्हडेच नव्हे तर मी स्वतःही या बाबतीत प्रसिद्ध अशा काही घटनांची दाखल घेतली, काही ठीकाणांना भेट देऊन आलो, या साऱ्यांनवरून एकच निष्कर्ष समोर आला आणि तो म्हणजे भूत-प्रेत, जादू-टोणा या निव्वळ भाकडकथा असून काही समाजविघातक प्रवृत्तींमुळे असले प्रकार समाजात फार मोठ्या प्रमाणावर पसरवल्या जातात.

आज आपण २१व्या शतकात वास्तव्य करत आहोत आणि हे युग विज्ञानाचे युग म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळे आज आपला दृष्टीकोण हा विज्ञानावरच आधारलेला असावा, हे मला पटू लागले आहे. विज्ञान हेच मनुष्याचे भविष्य असून ते अनेक प्रयोगांतून आणि मानवी दृष्टीकोनाला पटेल अशा निरनिराळ्या साधनांतून जात असल्यामुळे त्याची वैधता निश्चितच चिरकाल टिकणारी आहे, हे त्या दृष्टीने विचार केल्यावर आपल्याला पटायला लागते. परमेश्वर, भूत-प्रेत तसेच याबाबतचे वेगवेगळे प्रकार हे कालानुरूप टाकून देऊन वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारलेला समाज निर्माण करण्याकरीता आजवर अनेक थोरा-मोठ्यांनी कार्य केले त्यात महात्मा फुले, संत गाडगे महाराज, राजर्षी शाहू महाराज, महादेव गोविंद रानडे, गोपाळ गणेश आगरकर, बाबासाहेब आंबेडकर, विनायक दामोदर सावरकर तसेच आजच्या युगातील नरेंद्र दाभोळकर, कॉ. गोविंद पानसरे, कुमार सप्तर्षी, श्याम मानव, बाबा आमटे, डॉ. अभय बंग आदींनी मोठे कार्य केलेले आहे. आज त्यांचेच विचार आचरणात आणण्याची गरज समाजाला आहे, असे माझे मत आहे. यांनी केलेल्या कार्याचे फळ म्हणूनच की काय महाराष्ट्रात तरी अंधश्रद्धा विरोधी कायदा लागू झालेला आहे. दाभोळकरांचा त्यासाठी बळी गेला. असो. परंतु कर्नाटक, तामिळनाडू येथील विज्ञानवादी संघटनांनीही आपल्या राज्यातील सरकारांकडे अशा प्रकारच्या कायद्याची मागणी केलेली आहे, हा या चळवळीचा एक छोटासा परंतु महत्त्वाचा विजयच म्हणावा लागेल.

या चळवळीचे एक अजून वैशिष्ठ्य म्हणजे यातील बहुतांश लोक परमेश्वरवादी नसूनही त्यांनी कुठल्याही धर्मावर कधीही आक्षेप घेतलेला नाही. त्यातील समाजविघातक रूढी-परंपरांवर असेल परंतु कुणाच्याही स्वतःच्या परमेश्वराला पूजण्याचा संवैधानिक अधिकारावर त्यांनी कधीही टीका केलेली नाही. त्या कायद्यातही तसा उल्लेख कुठेही नाही. तरीसुद्धा काही उजव्या विचारांच्या संघटना त्यांना याबाबत बदनाम करीत असतात. असो. तर म्हणूनच मी देखील माझ्यापासून सुरुवात करून माझ्या ब्लॉगवरून अशा प्रकारच्या सर्व कथा, ब्लॉग्ज पूर्णपणे नष्ट करतोय. ही कथा पुढे लिहणे देखील मी सोडलेले असून यापुढे या कथा तसेच अशा प्रकारचे कुठलेही लिखाण या ठिकाणी तरी प्रसिद्ध होणार नाही.

धन्यवाद!
तसदीबद्दल क्षमस्व!!
आपला
प्राजक्त प्र. कारंजकर
हैद्राबाद, भारत.

Popular posts from this blog

संवाद….माणसाला मिळालेली एक उपयुक्त देणगी

मराठी भाषा- एक संस्कृती

मराठी इतिहास आणि छत्रपती संभाजी महाराज भाग १